भीमा-चंद्रभागा दोन स्वतंत्र नद्या

भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा झाल्याने तेथून पुढे तिला चंद्रभागा नाव पडले, ही बाब खरी नाही. भीमा आणि चंद्रभागा या दोन्ही स्वतंत्र नद्या होत्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 6 Jul 2016, 4:11 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bhima and chandrabhaga both river are different
भीमा-चंद्रभागा दोन स्वतंत्र नद्या






म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘भीमा नदीचा आकार चंद्रकोरीसारखा झाल्याने तेथून पुढे तिला चंद्रभागा नाव पडले, ही बाब खरी नाही. भीमा आणि चंद्रभागा या दोन्ही स्वतंत्र नद्या होत्या. संत जनाबाईंच्या अभंगांमध्ये त्यासंबंधीचा दाखला मिळाला आहे,’ असा दावा वा. ल. मंजुळ यांनी सोमवारी केला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित प्राचार्य वसंत ढेकणे स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर या वेळी उपस्थित होते. ‘पंढरपूरपर्यंत भीमा नदी या नावाने ओळखली जाते. मात्र, पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या येथे नदीचा आकार चंद्रकोरीचा झाला असल्याने तेथून पुढे चंद्रभागा असे नाव रूढ झाले, असे पूर्वापार सांगितले जात आहे. मात्र, काही मीटर अंतराच्या फरकाने एकाच नदीची दोन नावे पडतात, असे कधी होत नाही. संत जनाबाईंच्या एका अभंगात ‘भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा’ असा उल्लेख आहे. त्यावरून भीमा आणि चंद्रभागा या दोन्ही स्वतंत्र नद्या विठ्ठल मंदिर परिसरात अस्तित्वात होत्या, हे स्पष्ट होते. कालांतराने त्यापैकी एक नदी लुप्त झाली. पंढरपुरातील चौफाळा परिसरात संशोधकांना तिचे अवशेष देखील सापडले आहेत,’ असा दावा मंजुळ यांनी केला. ‘संत मुक्ताबाई, संत जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई, सोयराबाई यांच्या विषयी काही लेखकांकडून चुकीचे लिखाण करण्यात आले आहे. त्यांच्या लिखाणाला कोणताही अधिकार नाही. या संतांची अनेक हस्तलिखिते प्राप्त झाली असून त्याचा अभ्यास केला जात आहे,’ असे मंजुळ यांनी सांगितले.

आजपर्यंत ज्ञानदेवाचा हरिपाठ सर्वपरिचित आहे. दिंड्यामध्येही ज्ञानदेवाच्या हरिपाठाचे पठण केले जाते. मात्र, निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई यांच्या हरिपाठाची हस्तलिखिते सापडली आहेत. कोल्हापूरचे एक संशोधक त्यावर अभ्यास करीत आहेत. - वा. ल. मंजुळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज